स्क्वॉड्रनमध्ये 16 अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा समावेश, तीन हवाई जहाजांचा कायम तळ राहणार दाबोळीतील आयएनएस हंस
प्रतिनिधी / वास्को
भारतीय नौदल एअर स्कॉड्रन (आयएनएएस) 323 हे स्वदेशी निर्मित हवाई पथक भारतीय नौदलाच्या सेवेत सामिल झाले. सोमवारी दुपारी दाबोळीतील आयएनएस हंस तळावर झालेल्या समारंभात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या स्कॉड्रनला सेवेत दाखल करून घेण्यात आले. यावेळी नौदलाचे व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार, गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फिलिपोस जोर्ज पायनामुट्टील, हिंदुस्थान ऍरोनॉटीकल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन उपस्थित होते. या स्कॉड्रनमध्ये 16 हेलिकॉप्टर्सचा समावेश असून पहिल्या टप्प्यात सहा हेलिकॉप्टर्सचा समावेश भारतीय नौदलाच्या सेवेत करण्यात आला आहे.
आयएनएएस 323 हे स्कॉड्रन पूर्ण स्वादेशी असून हिंदुस्तान ऍरोनॉटीकल लिमिटडने या स्कॉड्रन उभारणी केलेली आहे. हिंदुस्तान ऍरोनॉटीकल लिमिटेड भारतीय नौदलाला सोळा अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स बनवीत असून त्यातील पहिल्या युनिटची सहा हवाई जहाजे सोमवारी नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली आहेत. पहिल्या तुकडीतील सहापैकी तीन हवाई जहाजांचा तळ दाबोळीतील आयएनएस हंस असणार आहे. तर उर्वरीत हवाई जहाजे एअर स्कॉड्रन 323 मध्ये कार्यरत असतील. उर्वरीत दहा हवाई जहाजे येत्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत. आयएनएएस 323 या पथकाचे नेतृत्व कमांडर समीक नंदी करणार आहेत.
शक्तीशाली भारताच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पावले- संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना, आयएनएएस 323 या स्थापनेमुळे सागरी सुरक्षा सक्षम करण्याच्या प्रयत्नात भर घालणारी असल्याचे स्पष्ट करून नौदलाने मैलाचा दगड पार केल्याचे सांगितले. देशाच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती येणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नाना मुर्त स्वरूप देण्याचा हा आणखी एक महत्वाचा टप्पा असल्याचे श्री नाईक म्हणाले. आयएनएएस 323 चा भारतीय नौदलात प्रवेश हा एwतिहासिक क्षण आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाची पावले उचलत आहेत. सुरक्षा व्यवस्थेत अनेक सुधारणा घडत आहेत. भारत देश सुरक्षा व्यवस्थेत शक्तीशाली देश बनावा यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत. नौदलाची सक्षमता हा त्याचाच एक भाग आहे. भारत नौदल देशाच्या सेवेत उत्कृष्ठपणे कार्य करीत असून कोरोना काळातसुध्दा नौदलाने संकट दूर करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फिलिपोस जॉर्ज पायनामुट्टील यांनी आयएनएस 323 मधील तीन हवाई जहाजांचा तळ गोव्यातील आयएनएस हंस राहणार असल्याचे सांगितले व या स्कॉड्रनमधील 10 हवाई जहाजे येत्या वर्षभरात नौदलाच्या सेवेत दाखल होतील असे ते म्हणाले. हिदुस्तान ऍरोनॉटीकल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी यावेळी बोलताना आयएनएस 323 ची वैशिष्ठे सांगितली. या हवाई जहाजांमध्ये 19 नवीन सोयीसुविधांचा समावेश आहे. हिंदुस्तान ऍरोनॉटीकल लिमिटेडकडून भारतीय तटरक्षक दलासाठीही हवाई जहाजांची निर्मिती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.