वृत्तसंस्था/ बेंगळूर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या होणाऱया प्रो लिग हॉकी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्सविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी जोहान्सबर्गला प्रयाण केले. सदर स्पर्धेतील लढती 8 ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. भारतीय संघातील ललितकुमार उपाध्याय आणि जसकरण सिंग यांनी शेवटच्या क्षणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माघार घेतली आहे.
या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीतसिंगकडे सोपविण्यात आले आहे. शुक्रवारी भारतीय हॉकी संघ दोहामार्गे जोहान्सबर्गला रवाना झाला. प्रो लिग हॉकी स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 8 फेब्रुवारीला फ्रान्सबरोबर तर 9 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. भारतीय हॉकी संघाचा या स्पर्धेतील फ्रान्सबरोबरचा दुसरा सामना 12 फेब्रुवारीला तर दक्षिण आफ्रिकेबरोबरचा दुसरा सामना 13 फेब्रुवारीला खेळविला जाईल. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघातील ललितकुमार उपाध्याय आणि जसकरण सिंग यांची प्रकृती बिघडल्याने ते दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाऊ शकले नाहीत, अशी माहिती संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी दिली आहे. या स्पर्धेकरिता पाच राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाने गेल्या काही दिवसांपासून बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये जोरदार सराव केला आहे.
भारतीय हॉकी संघ- गोलरक्षक- पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक, बचावफळी- हरमनप्रित सिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुणकुमार, जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, मध्यफळी- मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, हार्दिक सिंग, सुमित, समशेरसिंग, विवेक सागर प्रसाद, आघाडीफळी- मनदीप सिंग, गुरसाहिबजित सिंग, आकाशदीप सिंग, शिलानंद लाक्रा, दिलप्रीतसिंग, अभिषेक.