वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरूष हॉकी संघाच्या विश्लेषण प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑलिंपिक हॉकीपटू ग्रेग क्लार्क यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा हॉकी इंडियाने मंगळवारी केली.
दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑलिंपिक हॉकीपटू ग्रेग क्लार्क यांच्यावर विश्लेषण प्रशिक्षकपदाची जबाबदारी टोकियो ऑलिंपिकपर्यंत सोपविण्यात आली आहे. ग्रेग क्लार्क या महिन्यात भारतीय हॉकी संघाच्या सराव शिबिरात दाखल होतील. 2013-14 च्या कालावधीत ग्रेग क्लार्क यांनी भारताच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाला मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने सुल्तान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धा जिंकली होती. 2017 ते 2020 या कालावधीत ग्रेग क्लार्क हे कॅनडाच्या पुरूष हॉकी संघाचे साहाय्यक प्रशिक्षक होते. आपल्या 11 वर्षांच्या हॉकी कारकीर्दीमध्ये त्यांनी 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या पुरूष हॉकी संघाचे ते सहा वर्षे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.