विध्वंसक पाणबुडय़ांसाठी शोधतोय मार्ग : सर्वेक्षणाच्या नावाखाली आगळीक
वृत्तसंस्था/ बीजिंग
दक्षिण चीन सागरात मनमानी केल्यावर ड्रगनची नजर हिंदी महासागरावर पडली आहे. चीन गुप्त सर्वेक्षण जहाजाच्या मदतीने भारताच्या प्रभावक्षेत्रात हेरगिरी करत आहे. हेरगिरीदरम्यान चिनी जहाज स्वतःची देखरेखीची उपकरणे बंद करत आहे. इंडोनेशियाच्या अधिकाऱयांनी या सर्वेक्षण जहाजाला पकडल्यावर चीनच्या या आगळीकीचा खुलासा झाला आहे.
यापूर्वी चीनचा पाण्याखालून जाणारा हेरगिरी ड्रोन इंडोनेशियाच्या सीमेनजीक आढळून आला होता. चीनचे जहाज 6 जानेवारी रोजी चीनच्या हैनान बेटावरून रवाना झाले होते. इंडोनेशियाच्या तटरक्षक दलाने 11 रोजी सुंडा सामुद्रधुनीनजीक हे जहाज पकडले आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण सामुद्रधुनीतून जाणाऱया प्रत्येक जहाजाला स्वतःची ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन सिस्टीम चालू ठेवावी लागते, परंतु चिनी जहाजाने असे करणे टाळले होते.
हिंदी महासागरासाठी धडपड
चीनचा हेरगिरी ड्रोन ‘हिंदी महासागराचे द्वार’ मानले जाणाऱया इंडोनेशियानजीक तिसऱयांदा आढळून आला आहे. चिनी सैन्य आता दक्षिण चीन समुद्रातून हिंदी महासागरात प्रवेश करण्याच्या मार्गाचा शोध घेत असल्याचा संशय आहे. या माहितीच्या मदतीने चीनच्या पाणबुडय़ा सहजपणे हिंदी महासागरापर्यंत मार्गक्रमण करू शकतात.
ऑस्ट्रेलिया, भारतासाठी डोकेदुखी
चीनच्या हा गुप्त ड्रोन सेलयार बेटसमुहानजीक आढळून आला आहे. हे बेट इंडोनेशियाच्या सुलवेसी प्रांतात असून तेथूनच सूंडा आणि लोमबोक सामुद्रधूनीचा मार्ग जातो. युद्धस्थितीत भारतीय आणि अमेरिकेच्या नौदलाने मलक्का सामुद्रधूनीचा मार्ग बंद केल्यास चीनकडे सूंडा तसेच लोमबोक सामुद्रधूनीद्वारे हिंदी महासागरात शिरण्याचा पर्याय आहे. हा पूर्ण भाग भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पाणबुडय़ांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
सिस्टीम बिघडल्याचा कांगावा
इंडोनेशियाच्या तटरक्षक दलाने चौकशी केली असता चिनी दलाने यंत्रणेत बिघाड झाल्याचे निमित्त पुढे केले होते. स्वतःचे एसआयएस चालू ठेवण्यासह कुठल्याही प्रकारचे सागरी संशोधन न करण्याची सक्ती इंडोनेशियाकडून करण्यात आली आहे. चिनी सर्वेक्षण जहाजाने दोनवेळा स्वतःचे ट्रान्सपाँडर बंद केले होते. यापूर्वी इंडोनेशियाच्या समुद्रात मच्छिमारांना एक गुप्त चिनी ड्रोन मिळाला होता.