वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस संकटामुळे मिझोराममधील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून गरजू व्यक्तींना रक्त पुरवठय़ाची जरूरी भासत आहे. अशा स्थितीमध्ये भारतीय फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआने रक्तदान करून गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण मिझोराममध्ये तीन आठवडय़ांसाठी लॉकडाऊनचा आदेश बजावण्यात आले असल्याने जनजीवन संपूर्ण ठप्प झाले आहे. तशातच लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवडय़ांसाठी वाढविण्याचे संकेत मिळाले आहेत. मिझोराममधील रक्त पुरवठा करणाऱया संस्थावर या परिस्थितीचा गंभीर परिणाम झाला आहे. गरजू व्यक्तीला या संस्थेचा सहजपणे संपर्क होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मिझोराममधील एका रूग्णालयाने यंग मिझो संघटनेशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. ही बातमी समजताच 29 वर्षीय जेजेने या संघटनेतील अन्य कार्यकर्त्यांसह जाऊन रक्तदान केले. मिझोराममधील सिनॉद हॉस्पिटलमध्ये जेजे व इतरांनी केलेल्या रक्तदानामुळे गरजू व्यक्तीला संभाव्य मृत्यूपासून वाचविले. जेजेसह एकूण 27 जणांनी आपले रक्तदान केले. सध्या संपूर्ण मानवजातच अडचणीत आली असून ज्यांना शक्य आहे, त्यांनी मदत करण्याची गरज आहे. आपण या कार्यासाठी अल्पशी मदत करू शकलो, याचे समाधान वाटते, असे जेजे नंतर म्हणाला.