वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिफाच्या 2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पुढील महिन्यात होणाऱया पात्र फेरीच्या सामन्यांसाठी भारतीय फुटबॉलपटूंना सरावाकरिता कतारला पाठविण्याची विनंती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली होती. कतारने या विनंतीला मान देवून भारतीय फुटबॉल संघाला कतारमध्ये प्रशिक्षणासाठी परवानगी दिली. त्यानुसार, भारतीय फुटबॉल संघ 19 मे रोजी कतारला प्रयाण करणार आहे.
भारतामध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक झाल्याने भारतीय फुटबॉल संघातील खेळाडूंना सरावाकरिता कतारला पाठविण्याची विनंती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली होती. कतारमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय फुटबॉलपटूंना 10 दिवसांच्या कालावधीकरिता सक्तीचे क्वॉरंटाईन करण्यात येईल. दरम्यान भारतीय फुटबॉलपटूंसाठी कतारमध्ये दोन आठवडय़ाच्या कालावधीकरिता जैविक सुरक्षाअंतर्गत सराव शिबीर आयोजित केले आहे. भारताचा पहिला सामना 3 जून रोजी होणार आहे. भारतीय फुटबॉल संघ 19 मे रोजी सायंकाळी कतारला प्रयाण करणार आहे.
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्याचे भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. दरम्यान 2023 आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत. भारताचे पात्र फेरीतील तीन सामने खेळविले जाणार आहेत. भारत आणि कतार यांच्यातील सामना 3 जूनला, भारत-बांगलादेश सामना 7 जूनला आणि भारत-अफगाण यांच्यातील सामना 15 जूनला होणार आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेतील गुणतक्त्यात भारत आपल्या गटातून पाच सामन्यांतून 3 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.