मेलबर्न / वृत्तसंस्था
पाली हिल, बांद्रा येथील 12 वर्षीय युवा बुद्धिबळपटू राहिल मुळीकला ऑस्ट्रेलियामधून भारताकडे परतत असताना मेलबर्न विमानतळावर अडवले गेले. राहिल कुटुंबियांसमवेत सुटी संपवून मुंबईला परतणार होता. पण, नव्या पासपोर्टसह जुना पासपोर्ट न जोडल्याने त्याला बोर्डिंगची परवानगी नाकारण्यात आली.
राहिलच्या अन्य कुटुंबियांचे जुने पासपोर्ट त्यांच्यासोबत होते. पण, राहिलचा जुना पासपोर्ट त्याच्याकडे नसल्याने तो हातात येईतोवर त्याला ऑस्ट्रेलियात थांबून रहावे लागले आणि नंतर परतीच्या विमान प्रवासाची तिकीटेही नव्याने आरक्षित करावी लागली. ‘नव्या नियमाची आम्हाला कल्पना नव्हती आणि रविवार असल्याने ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावास बंद असल्यामुळे देखील आमच्यासमोर काहीच पर्याय नव्हता’, असे राहिलच्या आई रुपाली मुळीक म्हणाल्या.
2382 एलो रेटिंग असलेल्या राहिलला पूर्वनियोजित फ्लाईट चुकल्यानंतर आता मुंबईऐवजी थेट चेन्नईला जावे लागणार आहे. चेन्नईत माजी वर्ल्ड चॅम्पियन ब्लादिमिर क्रॅमनिकच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय शिबिर होत असून त्यात राहिल सहभागी होणार आहे. या शिबिरानंतर त्याला लगोलग जिब्रॅल्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाकडे रवाना व्हावे लागणार आहे.