युजीन / वृत्तसंस्था
भारताच्या अन्नू राणीला येथील वर्ल्ड चॅम्पियनशिप महिला भालाफेक फायनलमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. अन्नू राणीने 61.12 मीटर्सची अपेक्षेपेक्षा कमी अंतराची फेक नोंदवली. या महत्त्वाच्या स्पर्धेत तिने दुसऱया प्रयत्नात दिवसातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पण, अन्य पाच थ्रोमध्ये तिला अगदी 60 मीटर्सचा मार्कही पार करता आला नाही. तिने 56.18 मीटर्स, 61.12 मीटर्स, 59.27 मीटर्स, 58.14 मीटर्स, 59.98 मीटर्स आणि 58.70 मीटर्सचे थ्रो केले. 29 वर्षीय अन्नू राणीची वर्षातील सर्वोत्तम फेक 63.82 मीटर्स इतकी आहे. या इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान चॅम्पियन केल्से-ली बार्बरने 66.91 मीटर्स थ्रोसह सुवर्ण जिंकले. अमेरिकेची कॅरा विंगर 64.05 मीटर्स थ्रोसह रौप्य तर जपानच्या हारुका कितागुचीने 63.27 मीटर्स थ्रोसह कांस्य जिंकले.