वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तसेच आशियाई क्रीडास्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय क्रीडा युवजन खात्यातर्फे देशातील मल्लांसाठी बल्गेरियामध्ये खास सरावाचे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी अखिल भारतीय कुस्ती संघटनेने 14 मल्लांची निवड केली असून त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता रवि दहिया आणि दीपक पुनिया यांचा समावेश आहे. अखिल भारतीय कुस्ती संघटनेतर्फे महिलांसाठी लखनौमध्ये सराव शिबीर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये महिला मल्ल, प्रशिक्षक वर्ग असे एकूण दहा जणांचा समावेश राहील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रवि दहीयाने रौप्यपदक पटकाविले होते तर दीपक पुनियाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
बल्गेरियातील हे सराव शिबीर 5 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिरासाठी फ्री स्टाईल प्रकारातील चार मल्ल, ग्रीको रोमन पद्धतीतील चार मल्ल तसेच दोन प्रशिक्षक व चार अन्य सहाय्यक मल्लांची निवड केली आहे.