न्यूझीलंड हॉकी दौरा : रानी रामपालचा एकमेव गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ ऑकलंड
कर्णधार रानी रामपालने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर भारतीय महिला संघाने या दौऱयातील चौथ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा पराभव केला.
47 व्या मिनिटाला रानीने हा गोल नोंदवला आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. या दौऱयातील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर दुसऱया व तिसऱया सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर विजय मिळविला होता. मंगळवारी चौथ्या सामन्यात मात्र भारताने दमदार प्रदर्शन करीत प्रारंभापासूनच आक्रमण सुरू केले आणि लगेचच पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळविला. पण त्याचे गोलात रूपांतर करता आले नाही. तरीही भारताने भक्कम बचाव व अचूक पासेसचा खेळ पुढे चालू ठेवला. त्यामुळे ब्रिटन महिलांना प्रतिआक्रमण करण्याची किंवा गोल करण्याची फारशी संधी मिळाली नाही.
‘आम्ही अनेक संधी निर्माण केल्या. आता त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करण्यासाठी काम करावे लागेल. संपूर्ण सामन्यात आमचा बचाव मात्र भक्कम झाला आणि हे चांगले लक्षण म्हणावे लागेल,’ असे प्रमुख प्रशिक्षक सोएर्द मारिने म्हणाले. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला होता. तिसऱया सत्रात भारताने आक्रमण करून आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण त्यावरही यश मिळविता आले नाही. भारताने सतत आक्रमण सुरूच ठेवले होते आणि 47 व्या मिनिटाला त्यांना पहिले यशही मिळाले. कर्णधार रानीने सर्कलमध्ये जागा निर्माण केली आणि एक जबरदस्त फटका मारून जाळय़ाचा अचूक वेध घेतला.
एका गोलाच्या पिछाडीमुळे ब्रिटन संघावर दडपण आले आणि यातून ते सावरू शकले नाहीत. ‘सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही देखील दडपणाखाली आलो होतो. पण आम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळले आणि एक गोल करण्यातही यश मिळविले. मनोबल उंचावण्यासाठी हा विजय आवश्यक ठरणार असला तरी माझ्यासाठी संघाची कामगिरी महत्त्वाची आहे. आम्ही अजूनही आक्रमक पण संयमाने खेळायला हवे,’ असे मारिने म्हणाले. उद्याच्या सामन्यासाठी आम्हाला आता लगेचच सज्ज व्हावे लागेल, असेही ते म्हणाले. बुधवारी याच दोन संघांत आणखी एक सामना होणार आहे.