2-1 गोलफरकाने विजय, उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम
भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघाने बलाढय़ जर्मनीला 2-1 असा पराभवाचा धक्का देत एफआयएच कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले.
भारतीय महिलांनी या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शनिवारी वेल्सचा 5-1 असा धुव्वा उडविला होता. तोच जोम कायम ठेवत रविवारच्या सामन्यात जर्मनीलाही चकित केले. भारताचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नर्सवर नोंदवले. लालरेमसियामीने दुसऱया मिनिटाला तर मुमताझ खानने 25 मिनिटाला हे गोल केले. जर्मनीचा एकमेव गोल ज्युल ब्ल्युएलने 57 व्या मिनिटाला नोंदवला. आता गटसाखळीतील भारताचा शेवटचा सामना मंगळवारी 5 रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे. 8 एप्रिलपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळविले जातील. भारतीय संघ सध्या गट ड मध्ये दोन सामन्यांत दोन विजय मिळवित पहिल्या तर जर्मनी दुसऱया स्थानावर आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
या सामन्यात भारताने दुसऱयाच मिनिटाला जर्मनीवर आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने ड्रगफ्लिक केले, पण जर्मनीची गोलरक्षक माली विचमनने तो अडविल्यानंतर रिबाऊंड झालेल्या चेंडूवर लालरेमसियामीने ताबा घेत हा गोल नोंदवला. पिछाडीवर पडल्यानंतर जर्मनीने भारतीय क्षेत्रात आक्रमण करीत बचावफळीला सतत दडपणाखाली ठेवले. पण भारतीय बचावफळीनेही त्यांना गोलपासून रोखण्यात यश मिळविले. भारतीय गोलरक्षक बिछू देवी खरिबमने शानदार गोलरक्षण करीत जर्मनीचे पेनल्टी कॉर्नरवरील अनेक प्रयत्न फोल ठरविले. याशिवाय तिने दुसऱया सत्रात अप्रतिम गोलरक्षण करीत जेटी फ्लेशुट्झचा पेनल्टी स्ट्रोकही वाचवला. भारतीय खेळाडूंनी प्रतिआक्रमणावर जास्त भर दिला होता. अशाच एका आक्रमणात त्यांनी लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यातील दुसऱयावर मुमताझने 25 व्या मिनिटाला गोल नोंदवत भारताची आघाडी 2-0 अशी केली.
पूर्वार्धात जर्मनीनेच जास्त आक्रमण केले. पण त्यांना पेनल्टी कॉर्नर्सचा उपयोग करून घेता न आल्याने सहा पेनल्टी कॉर्नर्स वाया गेले. याउलट भारताने पहिल्या हाफमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, त्यावर दोनचे रूपांतर गोलमध्ये केले. दोन गोलांची पिछाडी भरून काढण्यासाठी जर्मनीने आपले आक्रमण आणखी तेज केले. पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अखेरच्या सत्रात भारतानेही आक्रमक खेळ करीत जर्मनीच्या गोलपोस्टपर्यंत धडका मारल्या. पण त्यांनाही गोल करता आला नाही. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना जर्मनीने 57 व्या मिनिटाला पहिले व एकमेव यश मिळविले. ब्ल्यूएलने रिव्हर्स फटक्यावर हा मैदानी गोल केला. भारताने उर्वरित मिनिटांत आघाडी कायम राखत विजय साकार करून पूर्ण गुण वसूल केले.
भारताने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेत भाग घेतला असून 2013 मध्ये कांस्य मिळविले होते. मागील आवृत्तीसाठी मात्र भारतीय संघ पात्र ठरला नव्हता.