ऑलिम्पिक हॉकी – वंदना कटारिया भारताची पहिली ऑलिम्पिक हॅट्ट्रिकवीर
वृत्तसंस्था/ टोकियो
भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा 4-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे आव्हान राखले. स्ट्रायकर वंदना कटारियाने ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवत ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
भारताला बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक होते. त्यानुसार शुक्रवारी आयर्लंडवर आणि शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवित आव्हान जिवंत ठेवले. आता ग्रेट ब्रिटन-आयर्लंड सामन्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. वंदनाने 4, 17, 49 व्या मिनिटाला गोल नोंदवत भारतातर्फे ऑलिम्पिकमधील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. याशिवाय युवा खेळाडू नेहा गोयलने 32 व्या मिनिटाला एक गोल केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे टॅरीन ग्लासबी (15 वे मिनिट), कर्णधार एरिन हंटर (30), मेरिझेन मरायस (39) यांनी गोल नोंदवले. शेवटचे दोन सामने जिंकून भारताने पाच सामन्यात 6 गुण मिळवित गट अ मध्ये चौथे स्थान मिळविले. मात्र भारताला मागे टाकण्याची संधी आयर्लंडला आहे.
ब्रिटनविरुद्धचा आयर्लंडचा सामना अनिर्णीत राहिला किंवा ब्रिटनने विजय मिळविला तर भारताचे बाद फेरीतील स्थान निश्चित होईल. प्रत्येक गटातील पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ‘आजचा सामना खरोखरच अवघड होता. कारण द.आप्रेकेने आम्हाला जोरदार टक्कर दिली. सर्कलमध्ये त्यांना ज्या संधी मिळाल्या, त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठविला. बचावामध्ये आम्ही अजून सरस कामगिरी करायला हवी होती,’ असे कर्णधार राणी रामपाल म्हणाली. ‘आम्ही प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याच्या फार संधी दिल्या तर आमच्याकडून आणखी गोल नोंदवायला हवे होते. तरीही विजय आवश्यक होता, तो आम्ही मिळवलाय, हे महत्त्वाचे. उष्ण व दमट वातावरणात खेळणे सोपे नसते, त्यावर मात करीत हा विजय साकार केलाय,’ असे मुख्य प्रशिक्षक सोएर्द मारिने म्हणाले.
आधीच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताने प्रारंभापासून आक्रमक धोरण अवलंबत द.आप्रेका बचावफळीवर दडपण आणले. त्यामुळे पहिल्या दोन मिनिटांत भारताला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण ड्रगफ्लिकर गुरजित कौरला त्याचा लाभ घेता आला नाही. मात्र चौथ्या मिनिटाला भारताला पहिले यश मिळाले. उजव्या बाजूने नवनीत कौरने पुरवलेल्या पासवर वंदनाने अगदी जवळून हा गोल नेंदवला. दुसऱया सत्रात मिळालेल्या चौथ्या पेनल्टी कॉर्नरवर दीप ग्रेस एक्काच्या फ्लिकवर वंदनाने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. शेवटच्या सत्रात द.आफ्रिकेने तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारताने उत्तम बचाव करीत ते फोल ठरवले. 49 व्या मिनिटाला वंदनाने वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल नेंदवत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याआधी नेहाने गोल नोंदवत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली होती.