महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
वृत्तसंस्था /दुबई
पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱया महिलांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून भारतीय महिलांचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा 4 मार्चपासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांत सामने होणार असून ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी व विद्यमान विजेत्या इंग्लंडविरुद्ध होणार आहे. ही लढत हॅमिल्टनमधील सेडॉन पार्क येथे 5 मार्चला होणार आहे. विद्यमान उपविजेता भारत व पाक यांची लढत 6 मार्च रोजी टॉरँग येथे होईल. 31 दिवस चालणाऱया या स्पर्धेत एकूण 31 सामने होणार असून त्यात एकूण आठ संघांचा सहभाग असेल. यातील सामने ऑकलंड, ख्राईस्टचर्च, डय़ुनेडिन, हॅमिल्टन, टॉरँग व वेलिंग्टन या सहा शहरात खेळविण्यात येतील.
2017-20 या कालावधीतील आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये मिळविलेल्या क्रमवारीच्या आधारे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत तर न्यूझीलंड या स्पर्धेचा यजमान असल्याने त्यांना याआधीच पात्रता मिळाली आहे. सांघिक क्रमवारीनुसार बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडीज या संघांनी उर्वरित तीन स्थाने मिळविली आहेत.
कोरोना महामारीच्या कारणास्तव महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे शेवटच्या तीन संघांना क्रमवारीच्या आधारावर या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
लीग पद्धतीने यातील सामने खेळविण्यात येणार असल्याने सर्व आठही संघ प्रत्येक संघाविरुद्ध मुकाबला करणार आहेत. या फेरीनंतर पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे 30 मार्च रोजी तर ख्राईस्टचर्च येथे 31 मार्च रोजी दुसरा उपांत्य सामना होईल. 3 एप्रिल रोजी ख्राईस्टचर्चमध्येच जेतेपदासाठी लढत होणार आहे.
उपांत्य व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. महिलांची शेवटी आयसीसी स्पर्धा ऑस्ट्रेलियात मार्च 2020 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धा यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी भारताला हरवून जिंकली होती. आगामी विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय महिला संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार असून या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा भारताला उपयुक्त ठरणार आहे.