कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप : मनू भाकरचे चौथे सुवर्ण
वृत्तसंस्था /लिमा
भारताच्या मनू भाकर, रीदम सांगवान, नाम्या कपूर या संघाने आयएसएसएफ कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत 25 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत पूर्ण वर्चस्व राखले असून मनू भाकरचे हे या स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे. पुरुषांमध्ये आदर्श सिंगने रौप्य मिळविले.
सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय त्रिकुटाने अमेरिकन संघाचा 16-4 असा एकतर्फी पराभव केला. मनू भाकरने एकूण 4 सुवर्ण व एक कांस्य मिळविले असून नाम्या कपूरचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी वैयक्तिक 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्ण मिळवित ती नवी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुलमध्ये भारताच्या आदर्श सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याला अमेरिकेच्या हेन्री टर्नर लेव्हरेटकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत एकूण सहा स्पर्धकांनी भाग घेतला होता. बुधवारी आठव्या दिवसाअखेर भारताने पदकतक्त्यातील अग्रस्थान कायम राखताना 9 सुवर्ण, 7 रौप्य व 3 कांस्यपदके मिळविली. दुसऱया स्थानावरील अमेरिकेने 5 सुवर्णांसह एकूण 16 पदके पटकावली आहेत.