वृत्तसंस्था/ लखनौ
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दक्षिण आफ्रिका महिला संघाने यजमान भारताचा दुसऱया सामन्यात सहा गडय़ांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी मिळविली. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर थरारक विजय नोंदविला.
या दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकांत 4 बाद 158 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 159 धावा जमवित हा सामना जिंकला. आता या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून ते भारताचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वुलव्हर्टला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
भारताच्या डावामध्ये सलामीच्या शेफाली वर्माने 31 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 47, कर्णधार स्मृती मानधनाने 9 चेंडूत 1 चौकारांसह 7, हरलीन देवलने 31 चेंडूत 4 चौकारांसह 31, रॉड्रिग्ज 15 चेंडूत 2 चौकारांसह 16, रिचा घोषने 26 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 44 तर दिप्ती शर्माने 1 चौकारांसह नाबाद 7 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मेल्बा, इस्माईल, डी क्लर्क आणि बॉश्च यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या लिझेली लीने 45 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 70, बॉश्चने 2, कर्णधार लुसने 21 चेंडूत 3 चौकारांसह 30, वूलव्हर्टने 39 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 53, डु प्रेझने 1 चौकारांसह 10 आणि डी क्लर्कने नाबाद 3 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या 1 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि देवल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 4 बाद 158 (शेफाली वर्मा 47, मानधना 7, देवल 31, रॉड्रिग्ज 16, घोश नाबाद 44, शर्मा नाबाद 7, मेल्बा, इस्माईल, डी क्लर्क आणि बॉश्च प्रत्येकी 1 बळी).
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 159 (ली 70, बॉश्च 2, लुस 20, वुलव्हर्ट नाबाद 53, डु प्रेझ 10, डी क्लर्क नाबाद 3, गायकवाड, यादव, देवल प्रत्येकी 1 बळी).