वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला क्रिकेट टी-20 मानांकनात भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय संघाचे स्थान वधारले असून त्यांनी न्यूझीलंडला मागे टाकले आहे. त्याचप्रमाणे आयसीसीच्या ताज्या वनडे महिला मानांकन यादीत भारताने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. क्रिकेटच्या टी-20 प्रकारांत ऑस्ट्रेलियाने पहिले तर इंग्लंडने दुसरे स्थान मिळविले आहे.
शुक्रवारी आयसीसीतर्फे महिला टी-20 क्रिकेटची ताजी मानांकन यादी घोषित करण्यात आली. या यादीत ऑस्ट्रेलिया 291 गुणांसह पहिल्या तर इंग्लंड 280 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. भारताने 270 मानांकन गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या कामगिरीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडला एका गुणाने मागे टाकले. न्यूझीलंड 269 मानांकन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या ताज्या मानांकन यादीत ब्राझिल संघाच्या कामगिरीमध्ये सर्वात अधिक सुधारणा झाल्याचे जाणवले. ब्राझिलचे स्थान 11 अंकांनी वधारले. पूर्वी ब्राझिलचा संघ या मानांकन यादीत 38 व्या स्थानावर होता. आता तो 27 व्या स्थानावर आहे. ब्राझिलने 15 रेटिंग गुण मिळविले आहेत. मलेशिया संघाच्या कामगिरीत खूपच घसरण झाल्याचे जाणवले. मलेशियाचा संघ 31 व्या स्थानावरून 38 व्या स्थानावर घसरला आहे. सामोआ 16 व्या स्थानावर आहे तर इंडोनेशिया 20 व्या आणि अमेरिका 31 व्या स्थानावर आहेत. आयसीसीच्या टी-20 महिला क्रिकेट मानांकनात तीन संघांनी आपले स्थान गमावले आहे. 2017 ऑक्टोबरपासून डेन्मार्क आणि बेल्जियम या दोन्ही संघांनी एकही सामना खेळलेला नाही. तर कतारची स्थिती फार वेगळी नाही.
आयसीसीच्या वनडे महिला क्रिकेट मानांकनात ऑस्ट्रेलिया संघ 160 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 121 गुणांसह दुसऱया आणि इंग्लंड 119 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. महिलांच्या वनडे विश्व करंडक स्पर्धेचे सहा वेळा जेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलियाचा संघ मानांकन कालावधीत दर्जेदार कामगिरी करताना 21 पैकी 20 वनडे सामने जिंकत आठ गुणांची कमाई केली आहे. वनडे महिला ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 39 गुणांचा फरक आहे. दक्षिण आफ्रिकेने 107 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. या यादीत न्यूझीलंड 94 गुणांसह पाचव्या, विंडीज 85 गुणांसह सहाव्या, पाक 77 गुणांसह सातव्या, बांगलादेश 61 गुणांसह आठव्या आणि श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ 47 गुणांसह नवव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.