ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अनेक देशांची स्थिती चिंताजनक आहे. अमेरिकेत तर हाहाकार माजला आहे. या स्थितीतही कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक दिवसरात्र काम करत आहेत. अशा स्थितीत एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका भारतीय महिला डॉक्टरला तेथील लोकांनी कडक सॅल्यूट केले आहे.
डॉ. उमा मधुसूदन असे या भारतीय महिलेचे नाव आहे. या फिजिशिअन असून त्या विंडोसर हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर उपचार केले असून अनेकांचे जीव वाचवले आहेत. डॉ. उमा यांच्या या कार्याचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे.
डॉ. उमा यांच्या घराबाहेर तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले. सर्व गाड्यांनी हॉर्न वाजवून अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. या गाड्यांमध्ये बरे झालेले रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, पोलीस यांनी त्यांचे धन्यवाद मानले. यावेळी अग्निशमन दल, रुग्णवाहिकांच्या गाड्यांनी तर सायरन वाजवून त्यांचा सन्मान केला.
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले आहेत. या व्हिडिओ मध्ये डॉ. उमा देखील घराच्या आवारात एकट्याच उभ्या दिसत आहेत.