वृत्त संस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भारतीय माहिला फुटबॉल संघाचा सामना बलाढय़ ब्राझीलबरोबर होणार आहे. ब्राझीलचा महिला फुटबॉल संघ हा माजी विश्वकरंडक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील उपविजेता आहे.
पुढीलवर्षी होणाऱया एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला पूर्वतयारीकरिता अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित केले आहेत. भारत-ब्राझील यांच्यातील सामना 25 नोव्हेंबरला ब्राझीलमधील मॅनोस येथे होणार आहे. भारतीय फुटबॉल संघ चालू महिनाअखेरीस ब्राझीलच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात भारतीय माहिला फुटबॉल संघ 3 सामने खेळणार आहे.
भारत-ब्राझील यांच्यातील सामना 25 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबरला भारत-चिली तसेच 1 डिसेंबरला भारत-व्हेनेझुएला यांच्यात सामने खेळविले जाणार आहेत. फिफाच्या मानांकनात ब्राझीलचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. ब्राझीलच्या महिला फुटबॉल संघाने 2007 साली फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद तसेच 2004 आणि 2008 ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदके मिळविली आहेत. ब्राझीलच्या महिला संघाचे नेतृत्व मॅरेटा डिसिल्वा करीत आहे.