वृत्तसंस्था/ ढाका
येथे सोमवारपासून सुरू होणाऱया 19 वर्षांखालील वयोगटाच्या सॅफ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय महिला फुटबॉल संघ येथे दाखल झाला. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना सोमवारी श्रीलंका संघाबरोबर होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाईल, असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक ऍलेक्स ऍम्ब्रोस यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ दर्जेदार असून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीसाठी झगडावे लागणार आहे. 2022 सालातील एएफसी आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा त्याचप्रमाणे फिफाची 17 वर्षांखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. भारतामध्ये फुटबॉलचा प्रसार झपाटय़ाने होत आहे, असेही प्रशिक्षक ऍम्ब्रोस यांनी म्हटले आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ समतोल असून या आगामी स्पर्धेत त्यांची कामगिरी समाधानकारक हेईल, असा विश्वास प्रमुख प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.