वृत्तसंस्था/फुकेत (थायलंड)
येथे सुरू असलेल्या थायलंड खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची महिला मुष्टीयोद्धी मीनाक्षीला 51 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीच्या लढतीत थायलंडच्या जितपाँगकडून पराभव पत्करावा लागला.
51 किलो वजन गटातील या लढतीत दोन्ही स्पर्धकांनी आक्रमक ठोसे लगवण्यावर अधिक भर दिला होता. पण थायलंडच्या जितपाँगने मीनाक्षीचा 3-2 अशा गुणफरकाने पराभव केला. सोमवारी भारताच्या पाच महिला आणि एक पुरूष मुष्टीयोद्धय़ानी रिंगणात खेळताना दिसणार आहेत. पुरूषांच्या विभागातील लढतींना सोमवारी प्रारंभ होत आहे. महिलांच्या विभागात 48 किलो गटात भारताच्या मोनिकाची पहिल्या फेरीतील लढत फिलीपाईन्सच्या गेबुकोशी होणार आहे. 57 किलो वजनगटात मनिषाची सलामीची लढत थायलंडच्या पी.बोपाशी होणार आहे. 63 किलो गटात भारताच्या मोनिकाचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या सोमनूएकशी तसेच भाग्यवती केचारीचा सलामीचा सामना सोमवारी थायलंडच्या चुटीशी होणार आहे. या स्पर्धेत पुरूष विभागात गोविंद सहानी, अमीत पांगल, अनंत चोपडे, रोहित मोर, वरिंदर सिंग, सुमीत, आशीषकुमार आणि गौरव चौहान हे विविध वजनगटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.