वृत्तसंस्था/ कॅनबेरा
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया भारतीय महिला संघाने तिरंगी मालिकेची सुरुवात विजयाने केली. शुक्रवारी झालेल्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिलांनी 5 गडय़ांनी विजय मिळवला. प्रारंभी, इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 147 धावा केल्या. यानंतर, भारतीय महिलांनी विजयी लक्ष्य 19.3 षटकांत पूर्ण करत हा सामना जिंकला. आता, भारतीय महिलांची पुढील लढत रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.
प्रारंभी, कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला गोलंदाजांनी कर्णधार हरमनप्रीतचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये इंग्लंडला 3 धक्के दिले. एमी जोन्स (1), डॅनी वेट (4) आणि नतालिया स्केवियर (20) या तीन फलंदाज झटपट बाद झाल्या. यानंतर कर्णधार हेदर नाईट आणि टॅमी बेमाऊंट यांनी पाचव्या गडय़ासाठी 69 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. कर्णधार हेदर नाईटने शानदार खेळी साकारताना 44 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 67 धावा फटकावल्या. बेमाऊंटने 37 धावा करत तिला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लिश संघाला 7 बाद 147 धावा करता आल्या. भारताकडूनराजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हरमनप्रीतची चमक
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी सावध सुरुवात केली. सामन्यातील चौथ्या षटकांत स्केवियरने स्मृती मानधनाला (15) बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर, शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुसऱया गडय़ासाठी 37 धावांची भागीदारी करत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दरम्यान, ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना शेफाली वर्मा 30 धावांवर बाद झाली. रॉड्रिग्जलाही (26) कॅथरिन ब्रंटने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने 34 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 42 धावांची संयमी खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तानिया भाटिया (11) व दीप्ती शर्मा (नाबाद 12) धावा करत हरमनप्रीतला मोलाची साथ दिली. भारताने हे विजयी लक्ष्य 19.3 षटकांत 5 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडकडून कॅथरिन ब्रंटने 2, हेदर नाईट व स्केवियरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड महिला संघ 20 षटकांत 7 बाद 147 (स्केवियर 20, हेदर नाईट 67, बेमाऊंट 37, राजेश्वरी गायकवाड 2/19, शिखा पांडे 2/33, दीप्ती शर्मा 2/30)
भारतीय महिला संघ 19.3 षटकांत 5 बाद 150 (शेफाली वर्मा 30, जेमिमा 26, हरमनप्रीत नाबाद 42, दीप्ती शर्मा नाबाद 12, ब्रंट 2/33, हेदर नाईट 1/20).