आकांक्षा अरोडा यांच्याकडून दावेदारी
संयुक्त राष्ट्रसंघ
भारतीय वंशाच्या एका महिलेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आगामी महासचिव होण्यासाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमात (युएनडीपी) लेखापरीक्षण समन्वयक म्हणून कार्यरत आकांक्षा अरोडा या विद्यमान महासचिव अँटोनियो गुतेरेस विरोधात उमेदवारीची घोषणा करणाऱया पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
गुतेरेस यांनी संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख म्हणून स्वतःच्या दुसऱया कार्यकाळासाठी उमेदवारी सादर केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुखाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. जगातील सर्वोच्च राजनयिक पदासाठी निवडणुकीत उभी राहणार असल्याचे म्हणत आकांक्षा यांनी ‘अरोडाफॉरएसजी’ मोहीम चालू महिन्यात सुरू केली आहे.
31 डिसेंबर रोजी संपणार कार्यकाळ
यापूर्वी या पदावर बसलेले लोक संयुक्त राष्ट्रसंघाला उत्तरदायी ठरविण्यास अपयशी ठरले आहेत. याचमुळे महासचिव पदाच्या निवडणुकीत उभी राहणार असल्याचे आकांक्षा यांनी म्हटले आहे. महासचिव पदाच्या दुसऱया कार्यकाळासाठी उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याची घोषणा यांनी गुतेरेस यांनी यापूर्वीच केली आहे. गुतेरेस यांचा पहिला कार्यकाळ चालू वर्षातील 31 डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे.
महिलेला अद्याप हे पद नाही
गुतेरेस हे संयुक्त राष्ट्रसंघाचे नववे महासचिव आहेत. जागतिक संस्थेच्या 75 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कुठलीच महिला महासचिव होऊ शकलेली नाही. या पदाच्या निवडणुकीत सर्वच देशांकडून मतदान होणार आहे.