वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूची साथ पसरली असून या साथीच्या रोगामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीचा प्रसार विदेशातही झपाटय़ाने फैलावत असल्याचे आढळून आले आहे. या साथीच्या रोगामुळे भारतीय महिला हॉकी संघाचा चीनचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.
2020 च्या टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा चीनचा हा नियोजित दौरा 14 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केला होता. कोरोनाच्या फैलावामुळे चीनमधील सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अलिकडेच भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंड दौरा समाप्त झाला. आता भारतीय महिला हॉकी संघासाठी 4 आठवडय़ांचे सराव शिबीर आयोजित केले जाणार आहे. हे शिबीर 16 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान घेतले जाईल. भारतीय महिला हॉकी संघाने भुवनेश्वरमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्रताफेरीच्या स्पर्धेत अमेरिकेचा पराभव करून टोकियो ऑलिपिंकचे तिकीट आरक्षित केले. ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ तिसऱयांदा सहभागी होत आहे.