वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
अर्जेंटिनाच्या दौऱयावर असलेल्या भारतीय वरिष्ठ महिला हॉकी संघाला अर्जेंटिनाच्या ब महिला हॉकी संघाकडून पराभव पत्करावा लागला. या दौऱयातील भारतीय महिला हॉकी संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जेंटिना ब संघाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात अर्जेंटिना ब संघातर्फे पेगेलाने 25 व्या मिनिटाला, सेरेनडोलोने 38 व्या मिनिटाला तर गोझेलेनीने 39 व्या मिनिटाला गोल केले. भारतातर्फे सलीमा टेटेने 6 व्या मिनिटाला तर गुरजीत कौरने 42 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने पेनल्टी स्ट्रोकची संधी गमविली. या दौऱयात आता भारतीय महिला हॉकी संघाचे 4 सामने अर्जेंटिनाच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाबरोबर या आठवडय़ात होणार आहेत.