वेल्सविरुद्ध 5-1 फरकाने एकतर्फी बाजी
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रुम
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या शनिवारपासून येथे सुरू झालेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेला विजयी सलामीने प्रारंभ केला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने वेल्सचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
शनिवारी झालेल्या या सामन्यात भारतातर्फे लालरेमसियामीने चौथ्या मिनिटाला, लालरिनेडेकीने 32 व्या मिनिटाला, मुमताज खानने 41 व्या मिनिटाला, लालरिनेडेकीने 57 व्या मिनिटाला आणि दीपिकाने 58 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
या सामन्यात लालरिनेडेकीने दोन गोल केले. त्यापैकी तिने आपला दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर त्याचप्रमाणे दीपिकाने आपला गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. वेल्सतर्फे एकमेव मैदानी गोल 26 व्या मिनिटाला मिली होमने केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे गोल बरोबरीत होते. या स्पर्धेत आता भारताचा ड गटातील दुसरा सामना रविवारी बलाढय़ जर्मनीविरुद्ध होणार आहे. प्रत्येक चार वर्षांनी ही स्पर्धा भरविली जाते. सदर स्पर्धा गेल्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार होती पण दक्षिण आफ्रिकेतील कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती.
भारताने या स्पर्धेत यापूर्वी चारवेळा आपला सहभाग दर्शविला असून 2013 साली झालेल्या या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने कांस्य पदक मिळविले होते. भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघाला गेल्या स्पर्धेमध्ये आपली पात्रता सिद्ध करता आली नव्हती.