वृत्तसंस्था/ पोश्चेस्ट्रुम
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या विश्व हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी होणाऱया बलाढय़ हॉलंडविरूद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची सत्वपरीक्षा ठरणार आहे.
कनिष्ठ महिलांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारताने 2013 साली कांस्य पदक मिळविले होते. आता भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
या स्पर्धेमध्ये भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची कामगिरी दर्जेदार झाली असून आतापर्यंत एकही सामना गमविलेला नाही. भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेल्सचा 5-1 अशा गोलफरकाने, दुसऱया सामन्यात जर्मनीचा 2-1, तिसऱया सामन्यात मलेशियाचा 4-0 आणि चौथ्या सामन्यात कोरियाचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. बलाढय़ हॉलंडने ही स्पर्धा यापूर्वी तीनवेळा जिंकली आहे.
भारताने आपल्या गटात चारही सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले. तसेच हॉलंडने आपले सर्व सामने जिंकून आपल्या गटात पहिले स्थान पटकाविले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॉलंडने दक्षिण आफ्रिकेवर 5-0 अशी मात केली. या स्पर्धेत जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फरीचा दुसरा सामना होईल. रविवारी होणाऱया उपांत्य सामन्यात कर्णधार टेटे, मुमताज खान, शर्मिला देवी, लालरेमसियामी आणि लालरीनडिकी यांच्या कामगिरीवर भारतीय संघाचे यश अवलंबून राहील.