वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
5 ते 12 डिसेंबर दरम्यान होणाऱया महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी शुक्रवारी हॉकी इंडियाने भारताचा 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 6 डिसेंबरला मलेशियाविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेत भारत, चीन, कोरिया, जपान, थायलंड, मलेशिया यांचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी गोलरक्षक सविताची निवड करण्यात आली आहे. 2021 सालातील आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सर्वोत्तम महिला गोलरक्षकाचा पुरस्कार सविताला मिळाला आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये अनुभवी दीप ग्रेस एक्का हिच्याकडे उपकर्णधारपद सोमविण्यात आले आहे.
टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान मिळवणाऱया भारतीय संघातील इ. रजनी, उदिता, निक्की प्रधान, गुरजित कौर यांचा या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश आहे. मध्यफळीची जबाबदारी पी. सुशिला छानू, निशा, मोनिका, नेहा आणि ज्योती यांच्यावर राहिल.
नमिता टोप्पो आणि लिलिमा मिन्झ यांनाही या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली आहे. आघाडीफळीची जबाबदारी प्रामुख्याने वंदना कटारिया, नवनीत कौर, रजवींदर कौर, मारियाना कुजूर आणि सोनिका यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी नवज्योत कौर आणि टी. सुमनदेवी यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय महिला संघाचा विद्यमान विजेत्या कोरियाविरुद्धचा सामना 8 डिसेंबरला होणार आहे. 9 डिसेंबरला भारत-चीन तर 11 डिसेंबरला भारत-जपान सामने खेळवले जातील. 12 डिसेंबरला स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील वरील सर्व संघ एकाच गटात असून या गटातील पहिल्या दोन संघामध्ये अंतिम लढत होईल.