वृत्त संस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेत 5 डिसेंबरपासून सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने भारतीय संघाच्या कर्णधारपदी आघाडीफळीत खेळणारी लालरेमसियामीची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेसाठी भारताचा 18 जणांचा संघ जाहीर करण्यात आला.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने चौथे स्थान मिळविले होते. या संघामध्ये 21 वर्षीय लालरेमसियामीचा समावेश होता. आगामी कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून इशाका चौधरीची निवड केली आहे. या संघामध्ये भारताच्या वरिष्ठ महिला संघातील सलीमा टेटे आणि शर्मिलादेवी यांचा समावेश आहे. पर्यायी खेळाडू म्हणून प्रिती आणि प्रभलिन कौर यांची निवड करण्यात आली आहे.
2013 साली झालेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने इंग्लंडचा पराभव करून कांस्यपदक मिळविले होते. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आगामी स्पर्धेत भारताचा क गटात समावेश असून त्यांचा सलामीचा सामना 6 डिसेंबरला रशियाविरुद्ध, 7 डिसेंबरला अर्जेंटिनाविरुद्ध तर 9 डिसेंबरला जपानविरुद्ध होणार आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा खेळविली जाणार असून बाद फेरीच्या टप्प्याला 10 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. या स्पर्धेत अ गटात हॉलंड, कोरिया, आयर्लंड, झिम्बाब्वे, ब गटात- इंग्लंड, बेल्जियम, कॅनडा, उरूग्वे, क गटात- भारत, अर्जेंटिना, जपान, रशिया, ड गटात- जर्मनी, स्पेन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
भारतीय महिला संघ- लालरेमसियामी (कर्णधार), इशिका चौधरी (उपकर्णधार), बिचुदेवी के., खुशबु, अक्षता डेकले, प्रियांका, एल. मारिना, ए.कुजुर, बलजीत कौर, रिट, वैष्णवी फाळके, सलीमा टेटे, शर्मिलादेवी, बी. डुंगडुंग, दीपिका, मुमताज खान, संगीताकुमारी आणि जे.टोप्पो.