आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफी : मलेशियाचीही माघार
वृत्तसंस्था/ डाँघेइ, द.कोरिया
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील भारताची मोहीम संपुष्टात आली. भारतीय संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भारताला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. भारताप्रमाणेच मलेशियालाही याच कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी थायलंडचा 13-0 असा धुव्वा उडवित शानदार सुरुवात केली होती. पण विद्यमान विजेत्या दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्याने बुधवारचा हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर गुरुवारचा चीनविरुद्धचा सामनाही रद्द करावा लागला. यानंतर आशियाई हॉकी फेडरेशनच्या एका सूत्राने, भारत आता या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे सांगितले. भारतीय संघ सध्या विलगीकरणात असून बाधित झालेल्या खेळाडूचे नाव मात्र उघड करण्यात आलेले नाही. ‘मागील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय महिला संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या स्पर्धेत ते आता पुढे खेळू शकणार नाहीत,’ असे या सूत्राने स्पष्ट केले. आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा 2020 मध्ये होणार होती. पण कोरोना महामारीमुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती.