यिदान पुरस्कारादाखल मिळणार 28 कोटी रुपये : शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय शिक्षणतज्ञ रुक्मिणी बॅनर्जी यांना शिक्षणाच्या क्षेत्रात देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार ‘यिदान’ प्राप्त झाला आहे. या पुरस्कारासाठी 130 देशांमधील शिक्षणतज्ञ तसेच संशोधकांनी अर्ज केला होता. रुक्मिणी यांच्यासह शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधनासाठी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक हनुशेक यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
रुक्मिणी बॅनर्जी या मूळच्या बिहार येथील आहेत. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. 1991 मध्ये त्या पीएचडीसाठी शिकागो विद्यापीठात गेल्या होत्या. पीएचडी पूर्ण केल्यावर त्या देशात परतल्या आणि त्यांनी ग्रामीण मुलांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. प्रथम या स्वयंसेवी संस्थेच्या त्या सीईओ आहेत.
रुक्मिणी आणि त्यांच्या पथकाने 100 दिवसांमध्ये देशातील 6 लाख मुले आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्थितीवर अध्ययन केले होते. या अध्ययनात अनेक वर्षांपासून शाळेत जाणारी परंतु गणिताचे सोपे प्रश्नही सोडविता न येणाऱया मुलांची ओळख त्यांनी पटविली होती. त्यानंतर त्यांनी देशातील निम्म्याहून अधिक राज्यांच्या सरकारांसोबत मिळून एक कार्यक्रम तयार केला, यात मुलांना योग्यप्रकारे शिकविण्यावर भर देण्यात आला होता. तसेच त्यांची संस्था ‘असर’ नावाने एक अहवाल दरवर्षी प्रसिद्ध करत असते. या अहवालातील निष्कर्षांना गांभीर्याने घेतले जाते. सरकार देखील धोरण निर्मितीकरता या अहवालाचा अभ्यास करत असते.
शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार
यिदान प्राइज फौंडेशनची सुरुवात 2016 मध्ये झाली. चीनमधील समाजसेवक आणि उद्योजक चेन यिदान याचे संस्थापक आहेत. हा पुरस्कार शैक्षणिक विकास आणि शैक्षणिक संशोधन या दोन शेणींमध्ये देण्यात येतो. पुरस्कार विजेत्याला 28 कोटी रुपयांची रक्कम देण्यात येते.