अफगाणिस्तानात तालिबानचा धोका- देशाच्या मोठय़ा भूभागावर कब्जा
वृत्तसंस्था/ कंदहार
अफगाणिस्तानात तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाने अमेरिका, रशिया आणि भारतासह अनेक देशांसाठी डोकेदुखी निर्माण केली आहे. भारताचे 50 राजनयिक आणि कर्मचाऱयांनी कंदहार दूतावास सोडला असल्याची माहिती समोर आली आहे. पण तेथील आपत्कालीन सेवा सुरू आहेत.
दूतावास बंद करण्यात आलेला नाही. कंदहारमध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान सैन्यामध्ये सुरू असलेली लढाई पाहता कर्मचाऱयांना काही दिवसांपूर्वी बोलाविण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या 85 टक्के हिस्स्यावर कब्जा केल्याचा दावा तालिबानने केला आहे.
कंदहार आणि मजार-ए-शरीफ येथील दूतावास बंद करण्यात येणार नसल्याचे भारत सरकारकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणच्या सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
रशिया, चीनलाही धोका
अफगाणिस्तानात तालिबानचे वाढते प्रस्थ पाहता रशिया आणि चीन सतर्क झाले आहेत. तालिबानने मध्य आशियाई देशांच्या सीमांचा आदर करावा, हे देश कधीकाळी सोव्हिएत संघाचा हिस्सा होते असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानात सर्वात मोठे आव्हान युद्ध आणि अराजकता रोखण्याचे असल्याचे चीनचे विदेशमंत्री वांग यांनी मागील आठवडय़ात नमूद केले होते. अफगाणिस्तानातील अराजकता अन्य देशांमध्ये फैलावून क्षेत्रीय अशांतता निर्माण होऊ शकते असे तज्ञांचे मानणे आहे.
शेजारी देशांमध्ये पलायन
तालिबान शिरजोर झाल्यावर अनेक लोक शेजारचे मध्य आशियाई देश म्हणजेच ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तानात आश्रय घेऊ शकतात. हे देश रशियाचे शेजारी आहेत. या देशांमध्sय सुरक्षा संकट उभे राहण्याची चिंता रशियाला सतावत आहे.
भारताची भूमिका
भारताने तालिबानला कधीच अधिकृत मान्यता दिलेली नाही. तालिबानने चर्चेच प्रस्ताव दिला असता तो स्वीकारण्यात आला नव्हता. पण याला बराच काळ लोटला आहे. कंदहार विमान अपहरणावेळी असलेली स्थिती आता राहिलेली नाही. याचमुळे भारत पडद्यामागून तालिबानच्या संपर्कात असल्याचे मानले जाते.
चीन आमचा मित्र- तालिबान
तालिबान चीनला अफगाणिस्तानचा मित्र मानतो. शिनजियांग प्रांतातील उइगूर मुस्लीम उग्रवाद्यांना आश्रय देणारनसल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुशील शाहिन यांनी म्हटले आहे. युद्धाने जर्जर झालेल्या अफगाणिस्तानच्या पुनर्निर्मितीसाठी चीन गुंतवणूक करेल अशी अपेक्षाही तालिबानकडून व्यक्त करण्यात आली आहे.