14 वर्षीय मुलीचे दमदार भाषण – जागतिक नेत्यांना केले संबोधित
वृत्तसंस्था/ ग्लासगो
तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथील एका शाळेत 9 वीत शिकणाऱया 14 वषींय विनीशा उमाशंकरने स्वतःच्या प्रतिभेने जागतिक नेत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. हवामान बदलावर तिने केलेल्या भाषणाला अत्यंत प्रभावी ठरविण्यात येत आहे. राजपुत्र विलियम यांनी विनीशाला ग्लासगोमध्ये आयोजित सीओपी-26मध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. विनीशाने या परिषदेत नव्या भविष्यासाठी नवे व्हिजन थीमवर स्वतःचे म्हणणे मांडले आहे.
विनीशाला या परिषदेत बोलण्यासाठी 5 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत तिने मांडलेले मुद्दे ऐकल्यावर परिषदेत उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्ष आणि तज्ञांनी उभे राहून टाळय़ा वाजवून तिचे कौतुक केले आहे. विनीशाने हवामान बदलाच्या मुद्दय़ावर त्वरित कार्य सुरू करण्याचे आवाहन केले.
पूर्वीची पिढी जगातील नेत्यांबद्दल नाराज आणि निराश दिसते, या नेत्यांकडून करण्यात आलेली पोकळ आश्वासने याकरता कारणीभूत आहेत. त्या लोकांनी आश्वासने पूर्ण केली नाहीत, पण आम्ही नाराज होऊ शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
संतापासाठी वेळ नाही
आमच्याकडे संतप्त होण्याची वेळ नाही, कारण ही कार्य करण्याची वेळ आहे. प्रभावीपणे लागू होतील अशी कामे आम्ही करू इच्छितो. मी केवळ भारताची मुलगी असून पृथ्वीची मुलगी आहे आणि याबद्दल मला गर्व आहे. मी देखील विद्यार्थिनी आणि नवोन्मेषी, पर्यावरण कार्यकर्त्या आणि उद्योजिका आहे, पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी एक आशावादी आहे, असे तिने उद्गार काढले आहेत.
नवोन्मेषामुळे मिळाले व्यासपीठ
विनीशाने सोलर पॅनेलच्या मदतीने कपडे प्रेस करणाऱया इस्रीला ऊर्जा पुरविण्याचे काम केले होते. स्वीडनच्या चिल्ड्रन क्लायमेट फौंडेशनने तिला या नवोन्मेषाकरता चिल्ड्रन क्लायमेट पुरस्काराने गौरविले आहे. तिच्या प्रकल्पाला द अर्थशॉट प्राइज ग्लोबल अलायन्सकडून सातत्याने मदत मिळत राहणार आहे. या नवोन्मेषाच्या आधारारव तिला ग्लासगोच्या व्यासपीठावरून स्वतःची भूमिका मांडण्याची संधी मिळाली.
बोलणे थांबवा, काम सुरू करा
लोकांनी आता बोलत राहणे थांबवावे आणि कृतीस प्रारंभ करावा. जागतिक नेत्यांनी नवोन्मेषावर (इनोव्हेशन) भर द्यावा. जैविक इंधन, धूर आणि प्रदूषणावर आधारित अर्थव्यवस्थेची आम्हाला गरज नसल्याचे तिने म्हटले आहे.
जुने मुद्दे निकाली काढा
हवामान बदलात स्वच्छ तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर चर्चेदरम्यान विनीशाने जागतिक नेत्यांना जुन्या मुद्दय़ांवरील वादविवाद बंद करण्याचे आवाहन केले आहे. नव्या भविष्याला नव्या व्हिजनची गरज आहे. याचमुळे तुम्हाला तुमचा पैसा, वेळ आणि प्रयत्न आमच्या भविष्याला आकार देण्यासाठी गुंतविण्याची गरज असल्याचे विनीशाने म्हटले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सह अन्य जागतिक नेते सहभागी झाले होते.