वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सेनादलाच्या क्रीडा क्षेत्रातील माजी मुष्टीयोद्धे 49 वर्षीय नरेंद्र राणा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेने घेण्याचे ठरविले आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सीए कुट्टाप्पा यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
49 वर्षीय नरेंद्र राणा हे सेनादलाच्या क्रीडा केंद्रामध्ये सध्या मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी आपल्या मुष्टीयुद्ध कारकीर्दीत चारवेळा राष्ट्रीय विजेतेपद तसेच आशियाई स्पर्धेत कास्यपदकही मिळविले आहेत. त्यानंतर ते सेनादलाच्या क्रीडा केंद्रामध्ये दाखल झाले आहेत.
नरेंद्र राणा यांचे भारताचे मुष्टीयोद्धे अमीत पांगल आणि मनिष कौशिक यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. चालू महिन्यात होणाऱया विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेपूर्वी नरेंद्र राणा यांची प्रमुख प्रदशिक्षकपदी नियुक्ती केली जाईल. विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा सर्बियातील बेलग्रेड येथे 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी दीपककुमार, शिवा थापा आणि संजित यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. 20 ऑक्टोबरला भारतीय मुष्टीयुद्ध संघ बेलग्रेडला प्रयाण करणार आहे.