ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी धुव्वा, कार्तिक त्यागीचे 4 बळी, जैस्वाल, अथर्व अंकोलेकरची झुंजार अर्धशतके निर्णायक
पोर्टचेफस्ट्रूम / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज कार्तिक त्यागीने ऑस्ट्रेलियाची आघाडी लाईनअप अक्षरशः कापून काढल्यानंतर भारताने 74 धावांनी दणकेबाज विजय साकारला आणि आयसीसी यू-19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोरदार धडक मारली. प्रारंभी, यशस्वी जैस्वाल व अथर्व अंकोलेकरच्या झुंजार अर्धशतकांच्या बळावर भारतीय युवा संघाने 9 बाद 233 धावा धावांची मजल गाठली तर गोलंदाजांनी तुलनेने या माफक धावसंख्येचेही दिमाखात संरक्षण केले.
कार्तिकने 8 षटकात 24 धावात 4 बळी घेतल्यानंतर भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 159 धावांमध्येच गुंडाळला. यावेळी आणखी 6.3 षटकांचा खेळ बाकी राहिला.
त्यागीने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार मॅकेन्झी हार्वे (4) व हियर्ने (0) यांना लागोपाठ चेंडूंवर बाद करत ऑस्ट्रेलियन युवा संघाच्या डावाला पहिला सुरुंग लावला. तत्पूर्वी, सलामीवीर जेक प्रेझर-मॅकगर्क डावातील पहिल्याच चेंडूवर धावचीत झाला होता. कार्तिकला पुढे हॅट्ट्रिक साजरी करता आली नाही. पण, त्याने ऑलिव्हिएर डेव्हिएस (2) व पॅट्रिक रोव्ह (21) यांचेही बळी घेत ऑस्ट्रेलियाला आणखी झटके दिले.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम फॅनिंगने (75) एक बाजू लावून धरली. पण, पराभव लांबणीवर टाकण्याशिवाय तो आणखी काहीही साध्य करु शकला नाही. त्याने लियाम स्कॉटसह सहाव्या गडय़ासाठी 81 धावांची भागीदारी साकारली. ऑस्ट्रेलियन युवा संघाला शेवटच्या 10 षटकात 85 धावांची आवश्यकता होती, त्यावेळी फिरकीपटू बिश्नोईने स्कॉटचा बळी घेतला तर डावखुरा जलद गोलंदाज आकाश सिंगने फॅनिंगला बाद केले. आकाशने (3-30) टॉड मर्फी व मॅथ्यू विल्यम्स यांचे बळी घेत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
अथर्व अंकोलेकरचे अर्धशतक
तत्पूर्वी, जैस्वाल व अथर्व अंकोलेकरच्या संघर्षमय अर्धशतकी खेळीमुळेच भारतीय युवा संघाला निर्धारित 50 षटकात 9 बाद 233 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय युवा संघाला सातत्याने ठरावीक अंतराने झटके बसले. पण, अथर्व व रवी बिश्नोई यांनी सातव्या गडय़ासाठी 61 धावांची भागीदारी साकारत संघाला अडचणीतून बाहेर काढण्यात मोलाचा वाटा उचलला.
अथर्व 54 चेंडूत 5 चौकार व एका षटकारासह 55 धावांवर नाबाद राहिला. आघाडीवीरांध्ये केवळ सलामीवीर यशस्वी जैस्वालच ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर ठाण मांडून उभा राहू शकला. त्याने 82 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांसह महत्त्वपूर्ण 62 धावांचे योगदान दिले. दिव्यांश सक्सेना (14), तिलक वर्मा (2), प्रियम गर्ग (5) व धुव जुरेल (15) यांना मात्र बरेच झगडावे लागले.
ठरावीक अंतराने सहकारी फलंदाज बाद होत असल्याचे पाहत जैस्वालने आक्रमणावर भर दिला. पण, याच प्रयत्नात त्याने तन्वीर संघचा एक चेंडू यष्टीवर ओढवून घेतला. जुरेलने तंत्रशुद्ध फलंदाजीवर भर दिला असला तरी त्याची धावगती बरीच कमी होती. हेच दडपण झुगारण्याच्या प्रयत्नात त्याने मर्फीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रोव्हकडे सोपा झेल दिला. सिद्धेश वीर त्यानंतर स्वस्तात बाद झाला.
बिश्नोई व अथर्व यांनी मात्र अनपेक्षित संघर्ष साकारत विशेषतः पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ घेतला. बिश्नोईने कव्हरच्या दिशेने फटका लगावत चौकाराचा दुष्काळ संपुष्टात आणला. बिश्नोई नंतर 48 व्या षटकात धावचीत होत तंबूत परतला व तिथे ही जोडी फुटली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत यू-19 संघ : 50 षटकात 9 बाद 233 (यशस्वी जैस्वाल 82 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 62, अथर्व अंकोलेकर 54 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 55, रवी बिश्नोई 31 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 30. अवांतर 12. कॉरी केल्ली 10 षटकात 2-45, टॉड मर्फी 10 षटकात 2-40).
ऑस्ट्रेलिया यू-19 संघ : 43.3 षटकात सर्वबाद 159. (फॅनिंग 127 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 75, स्कॉट 71 चेंडूत 35, रोव्ह 40 चेंडूत 21. अवांतर 13. कार्तिक त्यागी 8 षटकात 4-24, आकाश सिंग 8.3 षटकात 3-30, रवी बिश्नोई 1-26).