वृत्तसंस्था/ दर्बान
येथे शुक्रवारपासून सरू झालेल्या चौरंगी वनडे क्रिकेट मालिकेत भारतीय युवा संघाने विजयी सलामी देताना दक्षिण आफ्रिकेचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार प्रियाम गर्गने शानदार शतक (110) झळकविले.
19 वर्षाखालील वयोगटाच्या आगामी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीला भारतीय युवा संघाने प्रारंभ केला आहे. या चौरंगी स्पर्धेतील शुक्रवारच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 50 षटकांत 5 बाद 264 धावा जमविल्या. त्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकांत 9 बाद 198 धावापर्यंत मजल मारली.
2020 च्या आयपीएल स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने प्रियाम गर्गला 1.90 कोटी रूपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. शुक्रवारच्या सामन्यात कर्णधार गर्गने 103 चेंडूत 110 धावा झळकविल्या. धृव जुरेलने 65 तर तिलक वर्माने 42 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे खुमालोने 53 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार पार्सन्सने 50 चेंडूत 57 धावा जमविल्या.
ऍड्रय़ू लोयुने 85 चेंडूत 45 दावा केल्या. भारतीय युवा संघातर्फे सुशांत मिश्राने 48 धावांत 4 बळी, बिस्नॉयने 29 धावांत 2 तसेच अंकोलेकर, वर्मा आणि त्यागी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या चौरंगी स्पर्धेत न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांचा समावेश आहे. अलिकडेच भारतीय युवा संघाने वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना रविवारी झिंबाब्वे बरोबर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 5 बाद 264 (गर्ग 110, जुरेल 65, वर्मा 42, खुमालो 4-53), दक्षिण आफ्रिका 50 षटकांत- 9 बाद 198 (पार्सन्स 57, लोयु 45 मिश्रा 4-48),