एस्ट्राजेनेकाच्या भारतात निर्मित कोविड-19 लसीच्या पुरवठय़ाच्या हमीसाठी राजनयिक प्रयत्न सुरू असल्याचे ब्राझील सरकारने सांगितले आहे. याचबरोबर ब्राझीलमधील प्रायव्हेट हेल्थ क्लीनिक असोसिएशनही भारत बायोटेकशी लसखरेदीसंबंधी बोलणी करत आहे.
ब्राझील पिछाडीवर
ब्राझील सरकारने लसपुरवठा लवकरात लवकर करण्यासाठी निर्यात निर्बंधांपासून वाचण्याकरता प्रयत्न तीव्र केले आहेत. दक्षिण अमेरिकेचा हा सर्वात मोठा देश लसीकरणात अन्य देशांपेक्षा मागे पडला आहे. कोरोनाप्रकरणी सरकारचा ढिसाळपणा तसेच दोन लाख बळींनंतर ब्राझील आता डोस खरेदी करण्यासाठी घाई करू लागला आहे. शेजारी देश चिली आणि अर्जेंटीनामध्ये लसीकरणाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.
20 लाख डोसच्या आयातीस मंजुरी
ब्राझीलची आरोग्य नियामकीय यंत्रणा एन्विसाने भारताकडून दोन दशलक्ष डोस आयात करण्यास मंजुरी दिली आहे. लसीचा पुरवठा प्रभावित होऊ नये याकरता राजनयिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताकडून लसीची आयात करण्यास यश मिळेल अशी ब्राझील सरकारला आशा आहे. भारत बायोटेककडून अद्याप एन्विसाकडे अर्ज करण्यात आलेला नाही.