पॅरिस / वृत्तसंस्था
एफएटीएफ या जागतिक दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्षस्थान भारतीय वंशाचे आणि सध्या सिंगापूरचे नागरिक असणारे टी. राजा कुमार यांना मिळाले आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. जर्मनीच्या मार्कस प्लेअर यांच्या स्थानी त्यांची निवड करण्यात आली. कुमार यांनी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे नेतृत्व केले असून शुक्रवारपासून त्यांनी हा नवा पदभार स्वीकारला आहे.
दहशतवादी संघटनांना तसेच त्यांच्या हस्तकांचे आर्थिक स्रोत रोखले जावेत, यासाठी एफएटीएफ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना मनी लाँडरिंगविरोधातही कार्य करते. टी. राजा कुमार हे या संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि संघटनेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहतील, असा विश्वास त्यांच्या नियुक्तीनंतर संघटनेच्या सदस्य देशांनी व्यक्त केला. भारतानेही त्यांचे हे पद पटकाविण्यासाठी अभिनंदन पेले आहे.
प्रदीर्घ अनुभव
टी. राजा कुमार यांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व करण्याची उत्तम जाण असून त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते सिंगापूरच्या गृहविभागात उच्चाधिकार पदावर काम करीत आहेत. धोरण निर्धारणाचे उत्तरदायित्वही त्यांच्याकडे आहे. उप सचिव (आंतरराष्ट्रीय) हे पद त्यांच्याकडे असतानात त्यांनी अन्य देशांच्या विभागांशी सहयोग साधण्यात यश मिळविले होते. संरक्षण, अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोध या तिन्ही आघाडय़ांवर त्यांनी विश्व समुदायाला एकत्र करण्याच्या कार्यात महत्वाचे योगदान दिले असल्याचे त्यांच्यासंबंधी स्पष्ट करण्यात आले.