महामारीच्या विरोधात लढत असलेल्या अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकेतील डॉक्टरांनी कोरोनाच्या लसीचा डोस घेत इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित केले आहे. जीव वाचविण्यासाठी लस उपयुक्त असून वैज्ञानिकांच्या या ‘भेटी’मुळे कोविड-19 विरोधातील युद्धात जगाला विजय मिळणार असल्याचे भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.
अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएपीआय)चे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश रेड्डी यांनी सर्वांनी लस घ्यावी, ती अत्यंत प्रभावी असून आम्ही त्याचे चांगले परिणाम पाहत असल्याचे म्हटले आहे. रेड्डी यांनी फायजर लसीचा डोस घेतला असून कुठल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
टेक्सासमध्ये कार्यरत डॉक्टर जयेश शाह यांनीही फायजरची लस घेतली आहे. कोविड-19 ला पराभूत करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी. जर 70 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले तर यामुळे समूह प्रतिकारकशक्ती तयार होईल, असे त्यांनी म्हटले आहे. लसीवर सातत्याने काम सुरू राहते. ही कमी कालावधीत विकसित करण्यात आली असली तरीही याकरता अत्यंत मोठय़ा प्रमाणात साधनसामग्री वापरण्यात आल्याचे टेक्सास मेडिकल असोसिएशनच्या ट्रस्ट बोर्डाचे सदस्य शाह यांनी सांगितले आहे.
भारतीय विद्यार्थी अडकले
ब्रिटनमध्ये नाताळाची सुटी सुरू झाली आहे. अनेक भारतीय मायदेशी परतू पाहत असले तरीही भारत सरकारच्या प्रवासबंदीच्या निर्णयामुळे ते ब्रिटनमध्ये अडकून पडले आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी मायदेशी परततात. सध्या दोन्ही देश पर्यटनाचा व्हिसा देत नाहीत, परंतु कौटुंबिक कारणांमुळे जे लोक ब्रिटनमध्ये आहेत, त्यांना देखील मायदेशी परतणे अवघड होऊन बसले आहे. ब्रिटनमध्ये नवे शैक्षणिक सत्र पुढील महिन्यात सुरू होणार आहे. लंडनमध्ये भारतीय दूतावासाने समाजमाध्यमांवर भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सूचना मांडल्या आहेत. भारतातून सध्या पुठलेच विमान ब्रिटनमध्ये पोहोचणार नाही, वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत ब्रिटनमधूनही सर्व विमानोड्डाणे रोखण्यात आली आहेत.