कोविड-19 संबंधी बायडेन यांच्या कृतिदलाचे सहअध्यक्षपद शक्य
भारतीय वंशाचे अमेरिकेतील डॉक्टर विवेक मूर्ती यांना कोरोना महामारीविषयक अमेरिकेचे आगामी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कृतिदलाच्या सह-अध्यक्षपदी नियुक्त केले जाऊ शकते. बायडेन सोमवारी स्वतःच्या कृतिदलाची घोषणा करणार आहेत. मूळचे कर्नाटकातील असणाऱया मूर्ती (43 वर्षे) यांना 2014 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचा 19 वा सर्जन जनरल नियुक्त केले होते.
ब्रिटनमध्ये जन्मलेले मूर्ती वयाच्या 37 व्या वर्षी अमेरिकेचे सर्जन जनरल झाले होते. या पदावर नियुक्त होणारे ते सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले होते. बायडेन-हॅरिस कोविड योजनेमध्ये मदत आणि 20 जानेवारी 2021 पासून त्याला अंमलात आणण्यासाठी अग्रगण्य वैज्ञानिक आणि तज्ञांच्या समुहाची घोषणा करणार असल्याचे बायडेन यांनी स्वतःच्या विजयी भाषणात म्हटले होते. या कृतिदलाचे नेतृत्व कोण करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नव्हते. माजी सर्जन जनरल डॉक्टर मूर्ती आणि एफडीएफचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांना कृतिदलाचा सह-अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता आहे.
कृतिदल काही दिवसातच बैठका सुरू करु शकतो, असे वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे. निवडणुकीदरम्यान मूर्ती हे सार्वजनिक आरोग्य आणि कोरोना विषाणूच्या मुद्दय़ांवर बायडेन यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक ठरले होते. बायडेन प्रशासनात त्यांना आरोग्यमंत्री केले जाणार असल्याचे अनेकांचे मानणे आहे.