ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेनमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी गेलेल्या एका भारतीय तरुण युक्रेनियन लष्कराच्या बाजूने युद्धभूमीत लढतोय. विऑन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या २१ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव सैनिकेश रविचंद्रन असं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युक्रेनसाठी लढणाऱ्या जॉर्जियन नॅशनल लीजन या लष्करी तुकडीमध्ये रविचंद्रन सहभागी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला मुलगा असं काही करेल यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वास बसत नाहीय. यासंदर्भात त्याच्या आईशी विऑन न्यूजने संपर्क केला असता त्यांनी आपला मुलगा असं पाऊल उचलेलं याची कल्पना नव्हती असं म्हटलंय. तसेच पाच दिवसांपूर्वी त्याचं आमच्याशी बोलणं झालं होतं, असंही त्याच्या आईने सांगितलं. दरम्यान, रविचंद्रन चा युक्रेनच्या लष्करी तुकडीतील जवानांसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या सैनिकांसोबतच सामान्य युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध लढताना दिसत आहेत. आता युक्रेनच्या सैन्याला भारतीयांसह इतर अनेक देशांतील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. किव्ह इंडिपेंडंटने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की रशियाच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील लोक लढत आहेत. तामिळनाडूमधील एका युवक आता युक्रेन निमलष्करी दलात सामील झाला असून तो रशियाविरुद्ध लढणार आहे.
तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील २१ वर्षीय विद्यार्थी, सैनिकेश रविचंद्रन हा रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनियन निमलष्करी दलात सामील झाला आहे. वृत्तानुसार, अधिकार्यांनी त्याच्या घरी जाऊन रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला आणि असे कळले की त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता.