नवी दिल्ली
एका माध्यमिक विद्यार्थ्याने भारताचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविला आहे. गुरुग्रामच्या सनसिटी स्कूलचा विद्यार्थी असलेला आर्यन जैन आणि त्याच्या टीमने अमेरिकेची अंतराळ संस्था नासाकडून आयोजित करण्यात आलेल्या आर्मेटिस नेक्स्ट-जेन एसटीईएम-मून टू मार्स ऍप डेव्हलपमेंट चॅलेंजचे विजेतेपद पटकाविले आहे. नासाच्या स्पेस कम्यूनिकेशन्स अँड नेव्हिगेशन्सने स्पर्धा आयोजित केली होती, यांतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरणे आणि तेथे संशोधन करण्याच्या अभियानाची रुपरेषा तयार करता येईल असे मोबाइŸल ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांना विकसित करायचे होते. टीम युनिटीचा आर्यन जैन सदस्य होता. अमेरिकेच्या व्हिटनी हायस्कुलच्या नेतृत्वात स्थापन 5 जागतिक शाळांच्या संयुक्त पथकात आर्यनचा समावेश होता. पथकाकडून विकसित करण्यात आलेल्या ऍपमध्ये अनेक वैशिष्टय़े आहेत. यातील एक आहे छोटा नकाशा. हा नकाशा चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना तांत्रिक स्वरुपात मदत करणार आहे. ऍपमध्ये मार्ग शोधण्याचे पर्याय, चंद्राच्या पृष्ठभागाचे चित्रण आणि 3 डी दृश्ये आहेत.