सेन्सेक्सने गाठला 367 अंकांच्या वाढीसह 60 हजारचा टप्पा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात व आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे. यासोबतच सेन्सेक्सने 60,000 अंकांचा महत्त्वाचा यशस्वी टप्पा पुन्हा प्राप्त करण्यात यश मिळवलं आहे.
जागतिक बाजारांमध्ये युरोपीय बाजारात सकारात्मक कल राहिल्याने भारतीय भांडवली बाजारात बँका आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांनी मजबूत कामगिरी केल्याचे दिसले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 367.22 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 60,223.15 अंकांवर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 120 अंकांनी वधारुन 17,925.25 वर बंद झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 2 हजार 400 अंकांनी वाढल्याचे दिसले. निफ्टीत 50 पैकी 33 कंपन्यांचे समबाग तेजीत होते.
दिग्गज कंपन्यांमधील बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक पाच टक्के तेजीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, कोटक बँक, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स आणि यासह आयसीआयसीआय बँक लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक, हाँगकॉँगचा हॅगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीत राहिले होते. जपानचा निक्की लाभात राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.01 टक्क्यांनी घसरलेले दिसले. तसेच मंगळवारच्या सत्रात विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये जवळपास 1,273.86 कोटी रुपयाच्या समभागाची खरेदी केली आहे.