वृत्तसंस्था/भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान आणि विद्यमान विजेत्या भारतीय संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीत फ्रान्सने भारताचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या स्पर्धेत सलामीच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यात फ्रान्सने भारताला पहिला पराभवाचा धक्का दिला होता. सदर स्पर्धेमध्ये भारतीय संघाला दोनवेळा फ्रान्सकडून पराभूत व्हावे लागले.
रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सर्वच विभागात भारताच्या तुलनेत फ्रान्सचा खेळ अधिक दर्जेदार झाला. फ्रान्सचा कर्णधार क्लिमेंटने या सामन्यात हॅट्ट्रीक साधताना तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. क्लिमेंटने या सामन्यात 26 व्या, 34 व्या आणि 47 व्या मिनिटाला गोल केले. भारतातर्फे एकमेव गोल सुदीप चिरमाकोने 42 व्या मिनिटाला नोंदविला. या स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीच्या बेल्जियमबरोबरच्या सामन्यात दर्जेदार खेळ झाला होता. रविवारच्या सामन्यात फ्रान्सला 14 तर भारताला केवळ तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले.
या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय आघाडीफळीने फ्रान्सच्या बचावफळीवर दडपण आणले होते. सामन्यातील पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. 12 व्या मिनिटाला अरिजित सिंग हुंदलने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने भारताला खाते उघडता आले नाही. सामन्यातील दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सने आपल्या आक्रमक खेळावर अधिक भर देत तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण भारताच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने फ्रान्सचे हल्ले थोपविले. दरम्यान 26 व्या मिनिटाला फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार क्लिमेंटने शानदार गोल नोंदविला. यानंतर फ्रान्सने पाठोपाठ आक्रमणे करत भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. 34 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर फ्रान्सचा दुसरा गोल कर्णधार क्लिमेंटने केला. 42 व्या मिनिटाला सुदीप चिरमाकोने मैदानी गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. 47 व्या मिनिटाला फ्रान्सला 11 वा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार क्लिमेंटने त्याचा पुरेपूर फायदा घेत संघाचा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हॉलंड पाचव्या तर दक्षिण आफ्रिका नवव्या स्थानी
बुकेन्सच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर हॉलंडने बेल्जियमच्या 6-4 अशा गोलफरकाने पराभव करत पाचवे स्थान पटकाविले तर कोरियाला हरवून दक्षिण आफ्रिकेने नववे स्थान घेतले. पाकला 11 व्या तर कॅनडाला 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनने सातवे तर मलेशियाने आठवे स्थान मिळविले.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात हॉलंडतर्फे मिलेस बुकेन्सने आठव्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर त्याने 20 व्या आणि 27 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल नोंदविले. ब्रेंट व्हॅन बिजेनेनने 15 व्या मिनिटाला, जेनसेनने 39 व्या मिनिटाला तर कास्पर व्हॅन डेर व्हानने 50 व्या मिनिटाला गोल नोंदविले. बेल्जियम संघातर्फे डिप्लसने 25 व्या मिनिटाला, डय़ुव्हेकोटने 36 व्या आणि 38 व्या मिनिटाला तसेच व्हिंटरने 52 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
दुसऱया एका सामन्यात स्पेनने मलेशियाचा 4-1 असा पराभव करत सातवे स्थान मिळविले. या सामन्यात स्पेनतर्फे क्युनिलने 49 व्या, 55 व्या, 58 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवीत हॅट्ट्रीक साधली. स्पेनचा चौथा गोल सिमोने सातव्या मिनिटाला केला. मलेशियातर्फे एकमेव गोल अनुरने चौथ्या मिनिटाला नोंदविला. मलेशियाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दक्षिण आफ्रिकेने कोरियाचा 4-0 असा पराभव करत नववे स्थान मिळविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. दक्षिण आफ्रिकेतर्फे कर्णधार मॉर्गनने 35 व्या आणि 47 व्या मिनिटाला असे दोन गोल तर लोराने 47 व्या आणि केराईने 53 व्या मिनिटाला गोल नोंदविले. कोरियाला 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पाकने पोलंडचा 5-0 असा पराभव करत 11 वे स्थान मिळविले. पाकतर्फे रिझवान अलीने दुसऱया आणि सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. मोईन शकीलने 22 व्या मिनिटाला, कर्णधार अब्दुल राणाने 30 व्या मिनिटाला तर मोहम्मद हमाउद्दीनने 43 व्या मिनिटाला गोल नोंदविले. पोलंडला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अन्य एका सामन्यात कॅनडाने चिलीचा 2-1 असा पराभव करत 13 वे स्थान पटकाविले. कॅनडातर्फे जॉन जेकोबायने 40 व्या मिनिटाला तसेच केंगने 52 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. चिलीतर्फे एकमेव गोल 57 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर ऍमोरोसोने केला. चिलीला 14 वे स्थान मिळाले. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेने इजिप्तचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-0 असा पराभव करत 15 वे स्थान पटकाविले. इजिप्त या स्पर्धेत शेवटच्या म्हणजे 16 व्या स्थानावर राहिले.