ऑनलाइन टीम / पुणे :
अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा पुणे तर्फे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महामंत्री, प्रख्यात लेखक, विचारवंत व भारतीय साहित्याचे गाढे अभ्यासक श्रीधर पराडकर यांचे ‘भारतीय साहित्य परंपरा’ या विषयावरील व्याख्यान दि. २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय साहित्य विश्वामध्ये आज अनेक आंदोलने सुरू आहेत. वेगवेगळ्या पक्षांच्या आणि विचारसणींच्या नावाखाली अनेक आंदोलने होत असतात. काही ठराविक राजकीय पक्षांना बौद्धिक पाठबळ देण्यासाठी देखील अशा प्रकारची आंदोलने चालवली जात आहेत. संपूर्ण साहित्य विश्व वेगवेगळ्या विचारप्रवाहांमध्ये विभागले गेले आहे आणि विविध वादविवादांमध्ये गुरफटलेले दिसुन येत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याकडे समग्रतेने पाहण्याचा एक भारतीय दृष्टिकोन नष्ट झाला आहे. म्हणूनच, अखिल भारतीय साहित्य परिषदेने भारतीय साहित्य आणि मूळ भारतीय साहित्य परंपरेचा साहित्य जगताला पुनः परिचय करून देण्यासाठी गेले वर्षभर ‘भारतीय साहित्य परंपरा’ या विषयी व्याख्यानांची मालिका आयोजित केली आहे. आत्तापर्यंत देशातील 150 ठिकाणी ही व्याख्याने घेण्यात आली आहेत. या मालिकेतील पुढील व्याख्यान पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान सोमवार, दि. २० जानेवारी, २०२० रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत सावरकर भवन, स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे होणार आहे. सर्व लेखक, प्रकाशक, विचारवंत, अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा पुणेचे अध्यक्ष श्याम भुर्के यांनी केले आहे.