संघर्षाची व्यथा आम्ही जाणतो
श्रीनगर : सैन्याच्या चिनार कॉर्प्सने काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यादरम्यान सुरू असलेल्या संघर्षाला मानवी दृष्टीकोनातून दर्शविणारा लघुपट स्वतःच्या ट्विटर हँडलवरून प्रसारित केला आहे. 2016 मध्ये तयार झालेला हा लघुपट जखमी दहशतवादी आणि भारतीय सैनिकामधील भावनात्मक गुंतागुंतीवर केंद्रीत आहे.
13 मिनिटांचा लघुपट ‘हू डाइज’ (कुणाचा मृत्यू) काश्मिरी भाषेत आहे. याचे लेखक, दिग्दर्शक काश्मिरी अभिनेते शहनवाज बक्कल उर्फ रुफी खान हे आहेत. या लघुपटाचे प्रचंड कौतुक झाले असून न्यूयॉर्क पीस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखविण्यात आला आहे.
संघर्षाची व्यथा जाणते सैन्य
चिनार कॉर्प्सने ट्विटमध्ये या चित्रपटाची लिंक शेअर करत टिप्पणी केली आहे. ‘हू डाइज’ एक सैनिक संघर्षाची व्यथा जाणतो, प्रत्येक काश्मिरीचे जीवन महत्त्वपूर्ण असल्याचे यात नमूद आहे. बक्कल दिग्दर्शित हा लघुपट याचे अचूक उदाहरण आहे. चिनार कॉर्प्सने 1 नोव्हेंबर रोजी हा ट्विट केला होता. यानंतर 2 नोव्हेंबर रोजी काश्मीरमध्ये आयोजित फुटबॉल सामन्याची काही छायाचित्रेही प्रसारित केली होती.
‘हू डाइज’ या लघुपटात दोन जणांना जखमी दाखविण्यात आले आहे. यातील एक दहशतवादी तर दुसरा सैनिक आहे. दोघेही योगायोगाने एकाच घरात आश्रय घेतात. परस्परांना मारण्याच्या सहज प्रवृत्तीदरम्यान दोघांमध्येही एक साधर्म्य आहे. हे दोघेही स्वतःच्या मुलांना अत्यंत प्रेम करत असल्याचे लघुपटात दर्शविण्यात आले आहे. शहनवाज या लघुपटाला समाजमाध्यमांवर प्रसारित करत असतात. त्यांनी एप्रिल 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले होते.