25 जानेवारीपासून सांभाळणार पदभार : काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांचा अनुभव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी हे सैन्याचे नवे उपप्रमुख होणार आहेत. 25 जानेवारी सैनी हे पद स्वीकारणार आहेत. जनरल मनोज मुकुंद नरवणे सैन्यप्रमुख झाल्याने उपप्रमुखपद रिक्त झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या अध्यक्षतेखालील सैन्य विषयक विभागाकडून एका वरिष्ठ सैन्याधिकाऱयाच्या नियुक्तीचा हा पहिलाच आदेश ठरला आहे.
कपूरथळा येथील सैनिक शाळा आणि राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल सैनी यांनी जून 1981 मध्ये जाट रेजिमेंटमधून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी दलाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. सैनी यांनी सैन्याच्या पुणे मुख्यालयाची धुरा सांभाळण्यापूर्वी पश्चिम थिएटरमध्ये अधिकारी म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, भारतीय सैन्य अकॅडमीचे कमांडेंट, देहरादूनमध्ये शस्त्र प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
इराक-कुवेतमध्ये संयुक्त राष्ट्र मोहिमेत उपमुख्य सैन्य कार्मिक अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मंगोलियामध्ये ग्लोबल पीस ऑपरेशन्स इनिशिएटिव्ह आणि ऑस्ट्रेलियात दहशतवादविरोधी सरावात त्यांनी भाग घेतला आहे. लेफ्टनंट जनरल सैनी यांना शौर्य आणि विशिष्ट सेवेसाठी अनेक पुरस्कारांन ाr सन्मानित करण्यात आले आहे.