ऑनलाईन टीम / लेह :
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चुमार-डेमचोक परिसरात प्रवेश केलेल्या एका चिनी सैनिकाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. नकळत या सैनिकाने भारतीय हद्दीत प्रवेश केला असून, प्रोटोकॉलनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्याला चीनच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या संदर्भात भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. पीएलए सैनिकाला कॉर्पोरल वांग किंवा लाँग म्हणून ओळखण्यात आले. पूर्व लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एलएसी ओलांडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. उंचीवरील प्रदेशात खराब हवामानामुळे त्या चिनी सैनिकाला वैद्यकीय मदत, अन्न आणि उबदार कपडे पुरवण्यात आले आहेत.
बेपत्ता सैनिकाबाबत पीएलएकडून विनंती प्राप्त झाली आहे. सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर चुशूल येथील मोलटू येथे होणाऱ्या बैठकीवेळी त्याला चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल, असे लष्कराने निवेदनात म्हटले आहे.