वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
येथील कलिंगा स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत इंग्लंडने आघाडी मिळविली होती तर भारतीय संघाला स्थिर होण्यासाठी झगडावे लागले. इंग्लंडचा पहिला गोल निकोल्स बेंडुरेकने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. सामन्याच्या दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या समशेरने गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यातील 52 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास 12 सेकंद बाकी असताना इंग्लंडच्या सॅम वॉर्डने पेनल्टी स्ट्रोकवर दुसरा गोल नोंदविल्याने निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिले. पंचांनी त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी पाच प्रयत्नात दोन गोल नोंदवले. त्यानंतर सडनडेथमध्येही दोन्ही संघांचा पहिला प्रयत्न वाया गेल्यानंतर दुसऱया प्रयत्नात अभिषेकने निर्णायक गोल नोंदवला तर इंग्लंडच्या वार्डने फटका हुकल्याने इंग्लंडचे आव्हान 3-2 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले.