वृत्तसंस्था/ ढाक्का
विद्यमान विजेत्या भारतीय पुरूष हॉकी संघाने रविवारी येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील सामन्यात जपानचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून राऊंड रॉबिन गटात आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
येथील मौलाना भसानी हॉकी स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतातर्फे हरमनप्रित सिंगने 10 व्या आणि 53 व्या मिनिटाला दोन गोल नोंदविले. त्याचप्रमाणे दिलप्रित सिंगने 23 व्या मिनिटाला, जरमनप्रित सिंगने 34 व्या मिनिटाला, सुमीतने 46 व्या नमिनिटाला आणि समशेर सिंगने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या स्पर्धेत भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. राऊंड रॉबिन टप्पा अखेर भारताने पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गुणतक्त्यात 10 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. कोरिया 6 गुणांसह दुसऱया, जपान पाच गुणांसह तिसऱया, पाक दोन गुणांसह चौथ्या आणि यजमान बांगलादेश शून्य गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. राऊंड रॉबिन गटातील भारतीय संघाचा हा तिसरा विजय आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले होते. त्यानंतर दुसऱया सामन्यात मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान बांगलादेशचा 9-0 असा पराभव केला. त्याचप्रमाणे पारंपारिक पाकलाही पराभूत केले.
रविवारच्या सामन्यात भारतीय संघाचा जपानच्या तुलनेत सर्वच विभागात दर्जेदार खेळ झाला. या सामन्यात पूर्वार्धात भारताने आपले वर्चस्व ठेवले होते. पहिल्या सहा मिनिटाच्या कालावधीत भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्याचा लाभ घेता आला नाही. जपाननेही एक पेनल्टी कॉर्नर गमविला. मात्र 10 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने भारताचे खाते मैदानी गोलवर उघडले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 23 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगने भारताचा दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती. 34 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल जरमनप्रित सिंगने नोंदविला. 46 व्या मिनिटाला भारताचा चौथा गोल सुमीतने नोंदविला. 53 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने संघाचा पाचवा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. 54 व्या मिनिटाला समशेर सिंगने भारताचा सहावा आणि शेवटचा गोल नोंदवून जपानचे आव्हान संपुष्टात आणले. जपानच्या हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. मात्र रविवारच्या सामन्यात जपानला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. जपानला या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले.