वृत्त संस्था/ लॉसेनी
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची कनिष्ठांची विश्व चषक हॉकी स्पर्धा 24 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान आणि विद्यमान विजेता भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचा सलामीचा सामना फ्रान्सविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉ नुसार भारताचा ब गटात समावेश आहे. कॅनडा, फ्रान्स आणि पोलंड यांचाही ब गटात सहभाग आहे. अ गटामध्ये बेल्जियम, चिली, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, क गटामध्ये कोरिया, हॉलंड, स्पेन आणि अमेरिका, ड गटामध्ये अर्जेंटिना, इजिप्त, जर्मनी, पाकिस्तान या संघांचा समावेश आहे.
24 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया या स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारत-फ्रान्स, बेल्जियम- दक्षिण आफ्रिका, मलेशिया-चिली, जर्मनी-पाक, कॅनडा- पोलंड यांच्यात सामने होणार आहेत. भारताचा दुसरा सामना 25 नोव्हेंबरला कॅनडाबरोबर तर तिसरा सामना 27 नोव्हेंबरला पोलंड बरोबर होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 3 डिसेंबरला तर अंतिम सामना 5 डिसेंबरला होणार आहे. सदर स्पर्धेतून इंग्लंडने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने त्याच्या जागी पोलंडला बदली संघ म्हणून संधी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची महिलांची विश्वचषक कनिष्ठांची हॉकी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील पोश्चेफस्ट्रूम येथे 5 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ क गटात असून या गटात विद्यमान विजेता अर्जेंटिना, जपान आणि रशिया यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 6 डिसेंबरला रशियाबरोबर, दुसरा सामना 7 डिसेंबरला अर्जेंटिना बरोबर तर तिसरा सामना 9 डिसेंबरला जपान बरोबर होणार आहे.